Kuravpur

कुरवपूर माहात्म्य
आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट
सत्पुरूष: श्रीपादश्रीवल्लभ
विशेष: तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण   
पादुका: श्रीपाद श्रीवल्लभ पादुका
उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’
या मंत्राचा उच्चार होताक्षणी नजरेसमोर येते ते ‘श्री क्षेत्र कुरवपूर’ या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते.
दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.
कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत.
सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते;  पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या  कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात.
‘आश्विन वद्य व्दादशी’ हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.
रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो.
नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरूजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आत शेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण तीन मैल लांब, तीन फर्लांग रूंद असे असून कूर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत.
श्रींचे मंदिर ऐसपैस आहे. मंदिराच्या भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. त्याच्या शेजारी दगडी भिंती आहेत. महाव्दारावर कमान आहे. तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्याकरता दोन देवडया आहेत. भव्य अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून, त्यांना दगडी पार बांधला आहे. पाराच्या उत्तर बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांवर घडीव दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून, एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून, तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. यालाच ‘निर्गुण पीठ’ पार म्हणतात. स्वत: महाराज त्या ठिकाणी अदृश्य असल्यामुळे निराळ्या स्वरूपात पादुका नाहीत. याच ठिकाणी दिव्य अनुभव मिळतात. अर्थात त्यासाठी तेवढी साधना आवश्यक आहे.
श्री श्रीपादवल्लभांची अनुष्ठानाची जागा : सदर वृक्ष साधारणपणे ९०० वर्षांपूर्वीचा आहे. याचेच ढोलीमध्ये मोठा सर्प आहे. याच ठिकाणी सोलापूरच्या भक्तमंडळींनी श्रीपादवल्लभाची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत.
श्री टेंबेस्वामी गुहा

ही गुहा निसर्गनिर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधले आहे.
या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली.
महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसु शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे. फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पवित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच.
कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.
पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे. या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे. स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा-यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे. वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे. याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत. याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.
औदुंबर वृक्ष

या बेटावर असणारा औदुंबराचा वृक्ष अत्यंत डौलदार आहे. याठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे. या ठिकाणी काम करणारे पुजारी व त्यांचे कुटुंबीय येथे येणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची, जेवण्याची, चहापाण्याची इ. सोय नाममात्र खर्च घेऊन करतात. सदर बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्याने हे संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री गुरूदत्तांची सेवा, पारायण, जप, अनुष्ठान करावयाचे आहे. त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच आहे. कुणाचाही त्रास नाही. स्पीकर, रेडिओ, टीव्ही यांचा व्यत्यय नाही फक्त एकांतच. केवळ सांगून, वाचून अथवा ऐकून या स्थानाचे महत्व कळणारे नाही. जशी साखर किती गोड आहे ते ती खाल्ल्याशिवाय समजत नाही.
सदर क्षेत्र हे अनेक महात्मे येथे येऊन गेल्याने अतिशय पावन झाले आहे. श्री टेंबेस्वामी, श्री श्रीधरस्वामी, श्री नानामहाराज तराणेकर, श्री पोखरापूरकर महाराज, श्री गुळवणीमहाराज, श्री कवीश्वर, श्री मामादेशपांडे,  इ. तपस्वी व्यक्तींनी या ठिकाणी मुक्काम केला आहे.
येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक शिळा आहेत. असे वाटते की, पूर्वीची ऋषिमंडळी ध्यानमग्न होऊन शिळेच्या रूपाने येथे बसली आहेत. आपल्याकडे एक प्रथा आहे. देवदर्शन हात, पाय धुतल्याशिवाय घेऊ नये. या ठिकाणी मंदिरात पाय धुतल्याशिवाय प्रवेशच मिळतच नाही. येथील कृष्णा नदीच्या पात्रात पाय टाकल्यावर साऱ्या जगाचा विसर पडतो, दृष्टीस पडते ते फक्त श्रीपाद मंदिर.
श्री गुरुचरित्राच्या १० व्या अध्यायात त्यांच्या प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतर हि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले व आपल्या शिष्य वल्लभेषला परत जिवंत केले. अशी हि श्रीपाद श्रीवल्लभ व त्याचा निस्सम भक्त वल्लभेष या गुरु-शिष्याची कथा आहे. हि घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे. हे क्षेत्र कुरवपूर पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांचा निस्सम भक्त वल्लभेष या गुरु-शिष्याची कथा

सिद्ध्योग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, “कुरवपुराचे माहात्म्य कशाप्रकारे झाले ? आपण म्हणता, श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण पुढे असेही सांगता की, श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय? “नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, “अरे, श्रीगुरुंचे माहात्म्य काय विचारतोस ? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे, श्रीगुरुदत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपुरक्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्तरूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत. तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहित आहे ना ? सृष्टिक्रम अव्याहत परब्रम्हस्वरूप श्रीदत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविधकाळी अवतार घेतले हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात, त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात. श्रीगुरू कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो.
कुरवपूर माहात्म्य

गुरुचरित्र अध्याय १० मधील संकट दूर करणारा प्रसंग
पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राम्हण होता. तो अत्यंत सदाचारसंपन्न, सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्रीगुरुंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा, भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, “जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपुर यात्रेत जैन व एक सहस्त्र ब्राम्हणांना इच्छाभोजन देईन.” असा निश्चय करून मनोमन श्रीगुरुंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरुंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर ‘आम्हीही श्रीपादयतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत.’ अशी थाप मारून त्याच्या बरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापुर्वीच रात्रीच्यावेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राम्हणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुबाडले.
त्याचक्षणी भक्तांचे कैवारी, कुरवपुरवासी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहताचक्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्यापुढे आला आणि हात जोडून म्हणाला, “हे कृपावंत, जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असेलेल या ब्राम्हणाला मारतील याची मला कल्पना नव्हती, मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंत:करण आपणास समजते.”हे ऐकून श्रीपादयतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, “हि विभूती या मृत झालेल्या ब्राम्हणावर टाक.” मग त्या ब्राम्हणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याचक्षणी तो ब्राम्हण जिवंत होऊन इकडे-तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपादयती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राम्हणाने विचारले, “या माणसांना कोणी मारले ?” त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, “हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तेजस्वी सत्पुरुष आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून, मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे माला वाटते.” वल्लभेश ब्राम्हणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने एक हजार ब्राम्हणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला.
असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरू कुरवपुरात अव्यक्तरुपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले. कुरवपुराचे व तेथे अदृश्य रुपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्ल्भांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्रीनृसिंहसरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील.” सरस्वती गंगाधर सांगतात.” श्रोते हो ! आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील.”
(इथपर्यंतचा कथेचा पूर्वार्ध सर्वज्ञात आहे परंतु यापुढील उत्तरार्ध बराचस अप्रकाशित आहे… श्रीमत् गुरुचरित्र मूळ औपनिषदीय पोथीवरून घेतला आहे.)
पूर्वी कुरवपूर येथे देवळात वरती शिवपिंड व त्याखाली गुहेमध्ये श्रींच्या पादुका होत्या. ब्राह्मण वर जाऊन दर्शन घेऊन त्वरित पादुकांचे दर्शनास खाली यावे म्हणून वरती आला, पण तिथे रुद्राभिषेक चालू झाल्यामुळे तो तिथून जाऊ शकला नाही. लक्ष सगळे पादुकांकडे लागलेले. जसजसा विलंब होऊ लागला तसतसा वल्लभेश घायकुतीला आला. विरह हृदयात सोसवेना झाला.  काय करु भगवंता? अशी स्थिती झाली!
इतक्यात अचानक त्याला समोरची भिंत पारदर्शक दिसू लागली. खाली श्रीपादुका दिसल्या व मागे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः स्थानापन्न झालेले प्रत्यक्ष दिसू लागले!!
 स्वामींचे रुप वर्णनातीत! तेजपुंज गौरवर्ण, त्यावरील रेशमी भगव्या कफनी वरून प्रकाशज्योति परावर्तित होत होत्या. गळ्यात रूद्रमाळा शोभत  होत्या. कर्णकुंडलेही रुद्राक्षांचीच. जटाभार मस्तकी रुळलेला. तोही रूद्रमाळेने बंधन केलेला. कुबडीवर विश्रामलेल्या कराकमलामधे जपमाळ सरकत होती. दुसरा कर अभय प्रदर्शक. सरळ सुंदर नासिक. स्मित-विलग झालेले पातळसे ओष्ठद्वय. त्यातून डोकावणारी शुभ्र सरल दंतपंक्ति. त्रिभूवनाचे प्रेम ओसंडून वाहणारे अत्यंत आश्वासक अर्धोन्मिलित नेत्रकमल.. माथा शोभणारी विभूति व त्रिपुंड्र. असे स्वामी पद्मासन स्थित होते. मागेपुढे भाग्यवान सेवेकरी सेवा करीत होते. काही चवर्या ढाळीत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्यासर्वांमध्ये ते काही काळापूर्वी श्रींच्याच कडून गति पावलेले तस्करही श्री सेवेला उभे होते!
इथे गुरुचरित्र कथनकार क्षणभर विसंबून म्हणतात … बघ साधका, सद्गुरूंची कृपा व कोप दोन्हीमुळे  जीवाला एकच गति प्राप्त होत असते!!
रा.स्व.संघाचे संस्थापक पू. डॉ  केशव बळीराम हेडगेवार यांच्या वंशात काही पिढ्यांपूर्वी हा ‘वल्लभेश’ नावाचा दत्तगुरूंचा श्रेष्ठ भक्त होऊन गेला! प. पु हेडगेवार हेही दत्तभक्त होते.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील ‘कुरवपुरक्षेत्र महिमा’ नावाचा दहाव्या अध्यायात आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s